सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र त्यापुर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र स्वाभिमानी पक्षाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.
राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शहरी भागातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांमुळे असंतोष वाढलेला आहे. सत्ताधारी पक्षांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्वाभिमानी पक्षाने स्पष्ट केले आहे की, महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत शहरी जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला जाईल. गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच सक्षम पर्याय असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.