गेल्या दीड वर्षांपासून रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळत आहेत.
अशातच माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. पालकमंत्रीपदाबाबत सर्व काही निश्चित झाले असून केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. असं असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत पुढाकार घेतल्याचे वृत्त समोर आले असून तटकरे कुटुंबीयांकडून देखील रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय जवळपास निश्चित झाला असून, अखेर दिर्घकालीन प्रतिक्षेनंतर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडूनही येत्या तीन ते चार दिवसांत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील घडामोडींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णयाकडे आता रायगडसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.