सातारा: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर फरार झालेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री पोलिसांना शरण आला. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. बदनेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
25 जूनला का केली होती तक्रार?
कोर्टात बदनेची बाजू ॲड. राहुल धायगुडे यांनी मांडली. यावेळी बदनेच्या बाजूने युक्तिवाद करताना वकिलांनी बदने आणि डॉक्टर महिलेच्या भांडणाचा उल्लेख केला आहे. तसेच बदनेला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. माझ्या ड्युटीमध्ये आरोपी वैद्यकीय चाचणीसाठी का आणता? असे म्हणत महिला डॉक्टर आणि बदनेमध्ये वाद झाला होता. एवढच नाही तर 25 जूनला दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी देखील केल्या होत्या.
नेमकं भांडण का झालं?
फलटण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेल्यावर माझ्या ड्युटीमध्ये आरोपी का आणता यावरून डॉक्टर महिलेने बदनेशी वाद घातला होता. त्यावेळी तक्रार देखील केली होती, पण त्यावेळी बलात्काराची तक्रार करण्यात आलेली नाही, असे वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगाारा देत होता. त्याच्या शोधासाठी फलटण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं बीड, पुणे, पंढरपूर या ठिकाणी शोध घेत होती. पण काही पोलिसांच्या हाती लागला नाही. गोपाळ बदने फलटणहून पंढरपूरला गेला होता. तिथून तो सोलापूरला गेला. पुढे सोलापूरहून बदने बीडला आपल्या घरी गेला. दरम्यानच्या काळात बदने सोलापूरमधील काही पोलिसांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.
बदने बडतर्फ होण्याच्या भीतीने शरण आला
पोलिसात हजर न झाल्यास बडतर्फ करण्याची तंबी बदनेला मिळाली होती. नोकरीतून बडतर्फ होण्याच्या भितीनचं बदने फलटण पोलिसांना शरण आल्याचं बोललं जातं आहे. फरार असताना गोपाळ बदने पंढरपुरात थांबला होता. त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनवरून पोलिसांनी आता पंढरपुरातील लॉज आणि हॉटेल्सची झाडाझडती सुरु केली आहे, या काळात गोपाळ बदने कुणा कुणाच्या संपर्कात होता. त्याला फरार होण्यात कुणी मदत केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.