गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर तब्बल 26 दिवसांनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मात्र दिल्लीतील कॉक्रोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेलं आंदोलन अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील CJP आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात चर्चा सुरू आहे.
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर केंद्र सरकार आणखी कठोर पावले उचलणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुढीलआठवड्यात संसदेत पेपरफुटीविरोधातील कारवाई अधिक मजबूत करण्यासाठी नवीन विधेयक (Bill) सादर करण्याचाही सरकारचा मानस असल्याचे जाहीर केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मित्रांनो, मला माहिती आहे, पेपर लीक ही किरकोळ विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळं पेपर लीक घटनेनंतर आतापर्यंत गेल्या अडीच महिन्यात अनेक पावलं टाकण्यात आली. गुन्हेगारांना पकडण्यात आलं, ते तुरुंगात आहेत. आपली महत्त्वाची जबाबदारी होती, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, तात्काळ परीक्षा घेण्याची गरज होती. सरकारनं सर्व शक्तीचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन केलं. पाच सहा दिवसांपूर्वी 19 तारखेला निकाल देखील आला. देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या देखील आल्या. आम्ही त्यामध्ये समाधान माननारे लोक नाही, मी आज फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना आदेश दिले होते. विभागानं दिवसभर मेहनत करुन रात्री मला मसुदा दिला आहे. फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, तिथं अंतिम चर्चा होईल. सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा येईल, त्यावेळी लवकरात लवकर ते बील पास करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
त्याचसोबत सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर करत म्हणाले की, “आपल्या तरुणांचे कल्याण आणि भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही! पेपरफुटीत सहभागी असलेल्यांना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांच्या मालिकेतील हे एक पाऊल आहे. जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सोडले जाणार नाही.”
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले
नीट पेपरफुटीविरोधात सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या उपोषणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर तब्बल 26 दिवसांनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. 20 दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपोषणस्थळावरून हटवण्यात आले आणि हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर उपोषण सोडण्यात आलं.