भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारला सोमवारी सकाळी एका ट्रकने धडक दिली आहे. या अपघातात त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीच्या समोरील भागाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. प्रशांत पडोळे हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार आहेत. दरम्यान दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सोमवारी पहाटे भंडारावरून नागपूर विमानतळावर जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी देखील होते.
नागपूर विमानतळावर जात असताना अचानक रस्त्यात एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यांच्या गाडीच्या काही भागाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात खासदार प्रशांत पडोळे यांना किरकोळ जखम झाली असून ते सुखरूप आहेत. यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी एका दुचाकीस्वराला लिफ्ट मागून नागपूर गाठलं आणि तिथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर एअरपोर्टवर पोहोचून ते दिल्लीकडे रवाना झाले.
यापूर्वीही खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा नागपूर इथं काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले होते. त्यानंतर याच मार्गावर हा तिसऱ्यांदा अपघात घडला आहे. एकाच मार्गावर तिसऱ्यांदा पटोळे यांचा अपघात झाला आहे. यामुळे या अपघातामागे कटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.