बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीनां आदरांजली म्हणून आयोजित होणाऱ्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि भगवान बाबा भक्तांनी हजेरी लावली. सकाळी पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मात्र या मेळाव्यादरम्यान एक वादग्रस्त घटना घडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या कारावास भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर मेळाव्याच्या ठिकाणी झळकल्याचे समोर आले. “We Support Walmik Anna, कराड आमचे दैवत” अशा मजकुरासह हे पोस्टर लावण्यात आल्याचे समजते. त्यामुळे परिसरात चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे पोस्टर झळकणे ही समाजाच्या मानसिकतेतील अधोगतीचे लक्षण आहे. जर खरोखरच हे पोस्टर लावले गेले असेल तर ते अत्यंत लाजिरवाणे असून पंकजा मुंडे यांना याबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच यावरून राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मेळाव्यात पंकजा मुंडे पुढील राजकीय दिशा काय दाखवतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असले तरी वादग्रस्त पोस्टरमुळे कार्यक्रमाच्या चर्चेचा केंद्रबिंदू बदलल्याचे दिसून आले.