मुंबई: पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटांच्या लहान खोलीत पाहिलेली मोठी स्वप्ने आता खऱ्या अर्थाने गगनाला भिडणार आहेत. 'चाळकरी' ही ओळख पुसून नायगावचे रहिवासी आता दिमाखात 'टॉवर'चे मालक बनणार आहेत. आशियातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचे पहिले सोनेरी स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. उद्या, सोमवारी (16 मार्च 2026) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नायगावच्या 864 पात्र रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या 500 चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकांची चावी सुपूर्द केली जाणार आहे. हा केवळ एका वास्तूचा ताबा नसून, एका नव्या आणि प्रगत जीवनशैलीचा शुभारंभ आहे.
म्हाडाच्या माध्यमातून आकाराला आलेल्या आणि 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल' असे नामकरण झालेल्या या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा भव्य प्रातिनिधिक वाटप सोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे, या 864 सदनिकांपैकी 423 घरे ही राज्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या निवृत्त आणि कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या वारसांना मिळणार आहेत.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नायगावमधील 6.45 हेक्टर जागेवर विस्तारलेल्या या प्रकल्पात एकूण 42 चाळींतील 3344 भाडेकरूंचे नशीब बदलत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात प्लॉट 'ब' मधील 1401 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात असून, त्यापैकी पाच टॉवर्समधील 864 घरे तयार आहेत. उर्वरित 537 सदनिकांचे कामही अंतिम टप्प्यात असून, एप्रिल 2026 मध्ये ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुनर्विकासाच्या या काळात रहिवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना गाळे किंवा दरमहा 25 हजार रुपये भाडे (11 महिन्यांचे आगाऊ) असे उत्तम पर्याय देण्यात आले होते. तब्बल 65 टक्के भूखंडाचा वापर केवळ पुनर्वसनासाठी करून शासनाने पारदर्शकता जपली आहे, हे या प्रकल्पाचे मोठे यश मानता येईल.
नवीन घराचे स्वरूप पाहिले तर कोणत्याही उच्चभ्रू वसाहतीला लाजवेल अशी याची बांधणी आहे. 160 फुटांवरून थेट 500 चौरस फुटांच्या 2 BHK घरात जाताना रहिवाशांना मालकी हक्कासोबतच अनेक अत्याधुनिक सुविधा मोफत मिळणार आहेत. भूकंपरोधक तंत्रज्ञानावर आधारित या 23 मजली इमारतींमध्ये व्हिट्रीफाईड टाईल्स, ग्रॅनाईटचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा आणि ब्रँडेड प्लंबिंग करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही, तीन लिफ्ट (दोन पॅसेंजर, एक फायर लिफ्ट) आणि वाहनांसाठी तीन मजल्यांचे बेसमेंट पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हा प्रकल्प केवळ इमारतींपुरता मर्यादित नसून ती एक स्वयंपूर्ण वसाहत असणार आहे. स्वतंत्र शाळा, वेलफेअर सेंटर, सौर ऊर्जा, पर्जन्यजल संचयन अशा पर्यावरणपूरक सुविधा येथे असतील. तसेच, म्हाडातर्फे पुढील 12 वर्षे या सर्व सामायिक सुविधांची मोफत देखभाल केली जाणार आहे. वयोवृद्ध रहिवाशांना हा सोहळा अनुभवता यावा म्हणून नायगाव प्रकल्पाच्या जागीच (टी-6 आणि टी-7 आवारात) भव्य मंडप आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, '@mhadaofficial' या यूट्यूब आणि फेसबुक चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने, जगभरात कुठेही असलेला नायगावकर त्यांच्या जुन्या आठवणींना नव्या वास्तूचे रूप घेताना घरबसल्या पाहू शकणार आहे.