सध्या बारामती पोटनिवडणूकीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दुपारी 12.30 वाजता या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उडी घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगितले आहे.यावेळी ते म्हणाले की, “मी अनेक वर्ष ओबीसींच्या लढ्यासाठी लढत आहे. ओबीसींच्या मागण्या या सरकारकडून मान्य केल्या जात नाहीत.मात्र मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उदय सामंत, दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे यांचे फोन आले. त्यांनी बारामती पोट निवडणूक मध्ये उमेदवारी अर्ज भरू नका यासाठी विनंती केली. अजित दादा यांचे दुखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण आमची विनंती मान्य करावी असे ते म्हणाले. त्यांची ही विनंती मान्य करत मी बारामती पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली आहे”, असं हाकेंनी स्पष्ट केले.
त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचा पोटनिवडणुकीचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला आहे असं म्हटलं जात आहे. मात्र अजूनही कॉंग्रेस या शर्यतीत असल्याने आता पुढे राजकारणात काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.