अजितदादांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पुन्हा पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. पण 22 ते 23 उमेदवारांनी अर्ज वेळेत मागे न घेतल्यामुळे बारामतीत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरले आणि सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करावं, असं आवाहन बारामतीकरांना केलं. पण मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबातील अनेक लोकं माध्यमांसमोर बोलताना निवडणुकीबाबत वेगवेगळं आपलं मत मांडताना दिसले.
रोहित पवारांचा मोठा दावा, काय म्हणाले…
दादांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. दादांच्या कार्याला सलाम म्हणून बारामतीकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील आणि सुनेत्रा काकूंना विजयी करतील. आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्न राहिला नाही. 2029 ला पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये पुन्हा होऊ शकते, असं मत रोहित पवारांनी मांडले आहे.
माध्यमांसोबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर, 2029 ला अजितदादा मुख्यामंत्री झाले असते. पण आता ते शक्य नाही. बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार सामना बघायला अजिबात आवडत नाही. पण, त्या त्या वेळेला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.
जय पवारांकडून बारामतीत निवडणूक लढण्याचे संकेत
बारामतीमध्ये मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर जय पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता, 2029 ला विधानसभेला मी उमेदवार असावा, असं बारामतीच्या जनतेच्या मनात आहे. बारामतीत फिरत असताना मी निवडणूक लढवावी, असं अनेक लोकांनी मला सांगितलं. पण मला कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकाचे राहणार आहे.