Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसमोर 23 उमेदवारांचे आव्हान; वाचा ‘A To Z’ यादी

काँग्रेसचे आकाश मोरे यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, बाहेरील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.

Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसमोर 23 उमेदवारांचे आव्हान; वाचा ‘A To Z’ यादी

"बारामती" आणि "पवार" हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भक्कम समीकरण आहे. जेव्हा बारामतीच्या राजकीय आखाड्यात निवडणुकीचा धुरळा उडतो, तेव्हा संपूर्ण राज्याचे लक्ष तिकडे लागणे साहजिकच असते. यंदाच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र मात्र काहीसे वेगळे आणि रंजक वळण घेताना दिसत आहे. राजकारणात कोणतीही लढत सोपी नसते, याची प्रचिती सुरुवातीच्या चित्रामधून मिळाली होती. मात्र, ऐन वेळी घडलेल्या पडद्यामागच्या राजकीय घडामोडींनी आणि पवार कुटुंबाच्या राजकीय वजनामुळे सुनेत्रा पवार यांचा विधानसभेचा मार्ग आता बराचसा सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

काल गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीच्या राजकीय पटावर मोठे नाट्य पाहायला मिळाले. तब्बल 30 उमेदवारांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यात सर्वात लक्षवेधी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) मोठा दिलासा देणारी माघार म्हणजे काँग्रेसचे तगडे उमेदवार आकाश मोरे यांची. बारामती मतदारसंघात धनगर समाजाची एक मोठी आणि निर्णायक व्होटबँक आहे. आकाश मोरे हे याच समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने, त्यांचा प्रभाव सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य नक्कीच घटवू शकला असता. परंतु, पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत संपूर्ण कुटुंबाने आपली राजकीय ताकद एकवटली आणि मोरे यांची मनधरणी करून त्यांना माघार घ्यायला लावली.

आता माघारीचे सोपस्कार पार पडल्यानंतर बारामतीच्या आखाड्यात एकूण 23 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. मात्र, या यादीत एक मोठा विरोधाभास दडलेला आहे. या 23 पैकी केवळ 10 उमेदवार हे मूळ बारामती मतदारसंघातील (स्थानिक) आहेत. तर उरलेले तब्बल 13 उमेदवार हे सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, सातारा आणि अगदी पुण्यासारख्या बाहेरील भागातून नशीब काढण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. 'घरचे कमी आणि पाहुणेच जास्त' अशी काहीशी अवस्था सध्या या मतदारसंघातील उमेदवारांच्या यादीवरून पाहायला मिळत आहे. कुणी 'कपाट' तर कुणी 'शिट्टी', कुणी 'लिफाफा' तर कुणी 'बुद्धिबळपट' अशी विविध चिन्हे घेऊन हे अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. 

हेही वाचा: 'Metro Aqua Line 3'चं विद्यार्थी आणि पर्यटकांना खास गिफ्ट, मिळणार अमर्यादित प्रवास करण्याची संधी, पण…

     बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारांची यादी 

  1. सुनेत्रा अजित पवार
    पत्ता: बारामती | पक्ष: नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी | चिन्ह: घड्याळ

  2. सोनाली राणे
    पत्ता: कल्याण | पक्ष: अपक्ष | चिन्ह: कपाट

  3. डॉ. अभिजित बिचुकले
    पत्ता: केसकर पेठ, सातारा | पक्ष: अपक्ष | चिन्ह: दूरदर्शन

  4. करुणा धनंजय मुंडे
    पत्ता: उत्तम नगर, बीड | पक्ष: अपक्ष | चिन्ह: एअर कंडिशनर

  5. प्रा. आर. वाय. घटूगडे सर
    पत्ता: सांगोला, जि. सोलापूर | पक्ष: न्यू राष्ट्रीय समाज पार्टी | चिन्ह: शिट्टी

  6. साजन भगवान आडसुळ
    पत्ता: दादासो नगर, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: किटली

  7. शिवाजी कोकरे
    पत्ता: पणदरे, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: ट्रक

  8. सीताराम विठ्ठल रणदिवे
    पत्ता: तुंगत, ता. पंढरपूर | पक्ष: अपक्ष | चिन्ह: बॅटरी टॉर्च

  9. सतीश कृष्णा कदम
    पत्ता: जत, जि. सांगली | पक्ष: हिंदुस्तान जनता पार्टी | चिन्ह: हिरा

  10. सागर शरद भिसे
    पत्ता: सदर बाजार, सातारा | पक्ष: अपक्ष | चिन्ह: ट्रम्पेट

  11. विराज महादेव शिंदे
    पत्ता: आमराई, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: गॅस सिलेंडर

  12. सतीश सोनवणे
    पत्ता: चेंबूर, मुंबई | पक्ष: अपक्ष | चिन्ह: खाट

  13. डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे
    पत्ता: साठे नगर, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: रोड रोलर

  14. दत्तात्रय बेदरे
    पत्ता: मंगळवेढा, जि. सोलापूर | पक्ष: अपक्ष | चिन्ह: सीसीटीव्ही कॅमेरा

  15. भोसले रोहित राजू
    पत्ता: निरा वागज, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: बॅट

  16. चंद्रकांत रांगाजी मोटे
    पत्ता: अंबरनाथ | पक्ष: अपक्ष | चिन्ह: कॅमेरा

  17. योगेश मोहन
    पत्ता: उल्हासनगर | पक्ष: अपक्ष | चिन्ह: बासरी

  18. गजानन पाटील
    पत्ता: येवलेवाडी, पुणे | पक्ष: अपक्ष | चिन्ह: लिफाफा

  19. मंगलदास तुकाराम निकाळजे
    पत्ता: प्रबुद्ध नगर, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: फळांची टोपली

  20. चंद्रकांत वाघमोडे
    पत्ता: माळेगाव, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: प्रेशर कुकर

  21. मिथुन सोपान आटोळे
    पत्ता: खांडज, ता. बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: बुद्धिबळपट

  22. ॲड. अविनाश गायकवाड
    पत्ता: प्रगती नगर, बारामती | पक्ष: अपक्ष | चिन्ह: साखळी

  23. बाळासो मारुती धापटे
    पत्ता: भरणेवाडी, ता. इंदापूर | पक्ष: अपक्ष | चिन्ह: सफरचंद

    आकाश मोरे यांच्यासारख्या तगड्या स्थानिक आव्हानानंतर आता चर्चेत उरलेली नावे म्हणजे 'बिग बॉस' फेम डॉ. अभिजित बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे हीच आहेत. मात्र, हे दोन्ही उमेदवार बारामतीबाहेरचे असल्याने स्थानिक जनतेवर त्यांचा कितपत प्रभाव पडेल आणि ते सुनेत्रा पवार यांच्या 'घड्याळा'समोर खऱ्या अर्थाने एखादे मोठे आव्हान उभे करू शकतील का, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. लांबलचक यादीत स्थानिक विरोधक नसल्याने, ही लढत आता एकांगी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

    बारामतीचा आजवरचा इतिहास पाहता, दिवंगत अजित पवार हे नेहमीच दणदणीत मताधिक्याने विजयी होत आले आहेत. तोच कित्ता आता सुनेत्रा पवार यांनाही गिरवायचा आहे. त्यामुळेच ही निवडणूक केवळ विजयापुरती मर्यादित नसून, ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी 'मताधिक्याच्या प्रतिष्ठेची' बनली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी बारामतीकर त्यांचा कौल मतपेटीत बंद करतील आणि 4 मे  2026 रोजी राज्याचे लक्ष लागून राहिलेला हा निकाल जाहीर होईल. बारामतीचा हा गड सुनेत्रा पवार किती मोठ्या मताधिक्याने राखतात, हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवणे झालं अधिक सोपं; आता थेट एका क्लिकवर मिळणार मदत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number