मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी गारपिटीसह वादळी वाऱ्याने वसमत तालुक्यात केळी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच हिंगोली जिल्ह्यात तपमानाचा पारा आठवड्यापासून ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने कापणीवर आलेल्या केळीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वसमत तालुक्यातल्या दाभडी या शेत शिवारात तीव्र उन्हामुळे केळ्यांच्या वजन, गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असून हेक्टरी सरासरी दीड लाख रुपयाचे नुकसान होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केळी हे उष्णकटिबंधातील पीक असले तरी ३७ ते ३८ डिग्री सेल्सिअस तपमानात त्याची वाढ चांगली होते. मात्र तपमान चाळीसीपार गेल्यावर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. वाढत्या तपमानाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. तपमानाने झालेल्या केळी पिकांचे नुकसानीची भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.