अकोला: अकोला महानगरपालिकेत येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, प्रचार सभांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी पक्षनिष्ठा, प्रामाणिक राजकारण आणि मतदारांशी निष्ठा यावर ठाम भूमिका मांडत मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रचार सभेत बोलताना त्यांनी पक्षाशी बेईमानी न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघातून मला शिवसेनेने निवडून दिले. गुवाहाटीला गेलो असताना जीवाचे रान केले. जीव गेला तरी चालेल, पण पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले की, पक्षाशी बेईमानी करणे म्हणजे ज्या पक्षाने मला आमदार केले, माझे राजकीय अस्तित्व निर्माण केले, त्या पक्षाशीच बेईमानी करण्यासारखे आहे. पक्षाशी गद्दारी करणे म्हणजे आईच्या दुधाशी बेईमानी करण्यासारखे आहे, अशा स्पष्ट शब्दांत एकप्रकारे शिंदे गटावर टीका करत त्यांनी भूमिका मांडली.
माझा राजकीय जन्म हा बाळासाहेब ठाकरे यांनी घडवून आणला आहे. तसेच माझा राजकीय प्रवास आणि राजकीय जन्म हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यामुळे शिवसेनेशी बेईमानी करणे म्हणजे आईच्या दुधाबरोबर बेईमानी केल्यासारखेच आहे, असेही देशमुख यांनी ठामपणे सांगितले.
जे लोक पक्षाशी अशा प्रकारे बेईमानी करतात, ते मतदारांशी प्रामाणिक कसे राहू शकतील, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित करत त्यांनी मतदारांशी निष्ठा हीच खरी राजकीय मूल्य असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापुर मतदारसंघात प्रचार सभांना वेग आला असून, ठिकठिकाणी प्रचार सभा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना विशेष आवाहन केले.
मतांचे विभाजन होऊ देऊ नका. एकसंघ राहून योग्य निर्णय घ्या. मतदारांनी दिलेला विश्वास आणि पाठिंबा हा लोकशाहीचा कणा असून, त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे, असे देशमुख यांनी या दरम्यान सांगितले.