अमरावती: राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांच्या मालकीच्या अनेक खदानी असून त्या ठिकाणी त्यांच्याच मालकीच्या 'जगदंबा ट्रॅव्हल्स'चे किती ट्रक राबतात, याची सखोल चौकशी करण्याचे आव्हान त्यांनी प्रशासनाला आणि माध्यमांना दिले आहे. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
पुरावे तयार आहेत, 16 तारखेला धमाका होणार!
बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, ते हवेत बोलत नसून त्यांच्याकडे बावनकुळेंच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. "16 तारखेच्या निकालानंतर आम्ही बावनकुळेंचे सर्व काळे कारनामे उघड करणार आहोत. त्यांच्या किती खदानी आहेत आणि त्यातून किती अनधिकृत माया जमवली गेली आहे, हे जनतेला समजेल," असे कडू यांनी ठामपणे सांगितले. भाजपने नोटाबंदीच्या काळापासून आजवर सर्वच क्षेत्रांत लूट केली असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 'पैशावाल्यांना' संधी
भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले की, भाजपमध्ये 40 वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले जाते आणि केवळ ज्यांच्याकडे पैसा आहे, अशांनाच उमेदवारी दिली जाते. "प्रभू रामचंद्राच्या नावावर मते मागायची आणि प्रत्यक्षात मात्र सामान्य कार्यकर्त्याचा गळा घोटायचा, हा भाजपचा खरा चेहरा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
"लोकांचा संयम सुटलाय, एक दिवस रस्त्यावर मारतील"
जनतेच्या मनात भाजपबद्दल तीव्र चीड असल्याचा दावा करताना बच्चू कडू यांनी एक भीतीदायक भविष्यवाणी केली. "जर आमची सत्ता असती, तर आम्ही एका रिक्षावाल्यालाही महापौर बनवले असते. पण यांची मर्दानगी संपली आहे. जनतेला ज्या दिवशी या लुटीचा हिशोब समजेल, त्या दिवशी लोक भाजपच्या नेत्यांना रस्त्यावर गाठून मारतील. प्रभू रामचंद्रांचाच धनुष्य घेऊन हिंदू लोक यांच्या खोपडीत घालतील, अशी वेळ येईल," असे खळबळजनक विधान त्यांनी केले.