मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. यासोबतच त्यांना शिंदे गटाकडून विधान परिषदेची उमेदवारीही देण्यात आली आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना बच्चू कडू यांनी ठाम शब्दांत त्यांची भूमिका मांडली. “आज हे उचललेलं शिवधनुष्य मी पेलल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या सोबत माझा राजकीय प्रवास नव्याने सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली होती आणि आता पुढील राजकीय प्रवासही ते शिंदे गटासोबतच करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत कडू म्हणाले की, “शिंदे साहेबांच्या बंगल्याची दारे रात्री 2 वाजताही सामान्यांसाठी उघडी असतात. दिव्यांग मंत्रालय आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांत त्यांचा मोठा सहभाग आहे.” विचार आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत शिंदे यांच्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“मी पदासाठी येथे आलेलो नाही,” असे स्पष्ट करत कडू यांनी सांगितले की, दिव्यांगांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांच्या समस्या, हमीभाव आणि विधवा भगिनींच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. “आमचे मुद्दे मान्य झाल्यानंतरच मी हा पक्षप्रवेश केला,” असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात शिवसैनिक उभे करून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “झेंडा बदलला असला, तरी अजेंडा तोच आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कोणताही राजकीय पाठिंबा नसताना आपण राजकारणात सक्रिय राहिलो, आता शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याने अधिक ताकदीने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी बच्चू कडू यांनी सर्व कार्यकर्ते आणि माध्यमांचे आभार मानले. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.