“निवडणूक आयोग कधीच बरखास्त होऊ शकत नाही कारण, निवडणूक आयोग संविधानानुसार निर्माण झालेला आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच, “शिंदे गटाला व्हिप काढण्याचा अधिकार आहे तर ते व्हिप काढणारच”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव गटाला चांगलेच सुनावले.
उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, “निवडणूक आयोग बरखास्त करावा”, अशी मागणी उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली. “अगोदरच दोन्ही गटांना वेग- वेगळी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत तर आता आपल्या आमदारांना शिवसेनेचा व्हिप लागू होणार नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शुक्रवारी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षनाव यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. या निकालावर प्रतिक्रिया देताना, एकीकडे “तो निवडणुक आयोगाचा निकाल आहे, त्यावर चर्चा काही करता येणार नाही.” “मला या गोष्टीत पडायचे नाही.” असे म्हणत शरद पवारांनी उद्धव गटाला झटकले असताना आता दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनीही उद्धव गटाला कानपिचक्या दिल्या आहेत.