जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी अलिबाग शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. संपूर्ण शहरभर फिरून जिल्हा रुग्णालयाजवळ या रॅलीची सांगता झाली. या दरम्यान ठिकठिकाणी लोकप्रबोधन करण्यात आले. टीबी मुक्त रायगडचा संकल्प यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , प्रशिक्षणार्थी परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या.
दरवर्षी २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेकडून आजच्या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्या माध्यमातून या जीवघेण्या आजारापासून जगभरातल्या लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. २४ मार्च १८८२ साली जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोचने या जीवघेण्या आजाराच्या बॅक्टेरियाचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
क्षयरोगाला टीबी असंही म्हटलं जातं. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक थीम तयार करण्यात येते. टीबी अथवा क्षयरोग एक संक्रमक आजार आहे. मायक्रो ट्युबरक्लुलोसिस बॅक्टेरियामुळे क्षयरोग होतो. या रोगाचा क्षयरोग ग्रस्त रोग्याच्या खोकणे किंवा शिंकणे या माध्यमातून अन्य लोकांमध्ये प्रसार होतो. या रोगाबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार केल्यास त्याचे निदान होऊ शकते. जर या रोगामध्ये निष्काळजीपणा केला तर त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.