नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशीच राजकीय वातावरण तापलं आहे. प्रथेनुसार सरकारने विरोधकांना चहापानासाठी आमंत्रण दिलं असलं तरी विरोधकांनी या कार्यक्रमाचा ठाम बहिष्कार जाहीर करत सरकारविरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. नागपूरमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. यामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट महायुतीच्या अपयशाचा पाढाच समोर मांडत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे सांगून मतं घेतली आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढल्याचे सांगितले जात आहे. पण, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की, 1980 भारतीय जनता पक्षाचे 14 आमदार होते. तरीही विरोधी पक्षनेते पद दिले गेले. 1985 साली भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरीदेखील विरोधी पक्ष नेते दिले गेले होते. काँग्रेसने कधीही सत्ताधारी म्हणून संविधानिक पद रिक्त ठेवले नाही. मात्र, या लोकांना विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे. वाटेल त्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकायचा आणि काम करायचं. त्यामुळे दोन्ही पद रिक्त ठेवून चहा पानाला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कार टाकलेला बरा. हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे”.
पुढे ते म्हणाले की, “देशभरात 2014 सालापासून एक लाख 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 38.5 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावह आहे का? महाराष्ट्रात 2025 साली पहिल्या आठ महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2024 साली 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे म्हणतात की, आम्ही 27 नोव्हेंबरला अतिवृष्टी संदर्भातील मदतीचा प्रस्ताव पाठवला. केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात की, आमच्याकडे प्रस्तावच आला नाही. तो कदाचित गृहमंत्र्यांकडे अडकून पडला होता, अशी देखील काही चर्चा होत आहे. राज्यात शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानाला जाण्याचे औचित्य आम्हाला वाटत नाही. अजित पवार म्हणतात की, हे शेतकरी फुकटे आहेत. भारतीय जनता पक्षातील आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे ठरवले असेल तर अशा सरकारच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे”.