तिरुवनंतपुरम: निवडणुकीचा धुरळा खाली बसला असला तरी, राजकीय सारीपाटावरील सोंगट्यांचा खेळ आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. मात्र, 'पाच राज्ये आणि पाच वेगवेगळ्या राजकीय कहाण्या' असेच काहीसे चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये बहुमताच्या जोरावर सरकार स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे, तर काही ठिकाणी विजयाचा गुलाल उधळल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून सुरू असलेली सुंदोपसुंदी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.
एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच ऐतिहासिक मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. येथे सुवेंदू अधिकारी शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, आसाममध्ये भाजप आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत सिद्ध केले असून, हिमंता बिस्वा सरमा यांचा शपथविधी 12 मे रोजी पार पडणार आहे. दक्षिणेतील राजकारणाचा विचार केल्यास, तामिळनाडूमध्येही मोठे राजकीय स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. अभिनेता विजय थलपथी यांच्या नेतृत्वाखालील 'तामिळनाडू वेत्री कळघम' (टीव्हीके) ने राज्यपालांची तब्बल तिसऱ्यांदा भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला असून, लवकरच त्यांचाही शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे.
परंतु, या सर्व राज्यांच्या तुलनेत केरळम मधील राजकीय परिस्थिती सर्वाधिक गुंतागुंतीची आणि नाट्यमय बनली आहे. केरळम मध्ये काँग्रेसने मुसंडी मारत बहुमत तर मिळवले, पण 'बहुमत मिळाले, पण एकमत होईना' अशी काँग्रेसची सध्याची अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावावर पक्षात अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. हा तिढा सोडवण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे स्वतः आमदारांसोबत बैठक घेणार असून, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बहुतांश आमदारांचा कल के. सी. वेणुगोपाल यांच्या बाजूने असला तरी, काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीचा (UDF) महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या 'मुस्लिम लीग'ने व्ही. डी. सतीशन यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने पेच अधिकच वाढला आहे.
या राजकीय नाट्यात आणखी एक भर पडली ती एका व्हायरल फोटोमुळे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) बैठकीनंतर निरीक्षक मुकुल वासनिक यांच्या हातात एका यादीचा फोटो समोर आला आणि वादाला नवे तोंड फुटले. या यादीत आमदारांची नावे आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दिलेल्या पसंतीची नोंद असल्याचे वृत्त आहे. संदीप वॉरियर, सजीव जोसेफ, टी.ओ. मोहनन, सनी जोसेफ, उषा विजयन आणि टी. सिद्दिकी यांसारख्या अनेक आमदारांनी आपल्या नावापुढे 'केसी' (KC) असे लिहून के. सी. वेणुगोपाल यांना उघड पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे, आय. सी. बालकृष्णन यांच्या नावापुढे 'केसी+आरसी' (KC+RC) अशी नोंद असून, हा रमेश चेन्नीथला यांच्यासाठीचा छुपा पाठिंबा मानला जात आहे.
या यादीवरून आता पक्षात अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. उदुमा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार के. नीलकंठन यांनी शुक्रवारी थेट पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली. तिरुवनंतपुरम येथील बैठकीत आपण आपली पसंती स्पष्टपणे सांगितली असतानाही, वासनिक यांच्याकडील यादीत आपल्या नावापुढे कोणतीही नोंद का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ तोंडी नाराजी न नोंदवता त्यांनी थेट अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवून पक्षातील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सध्याच्या घडीला केरळम मध्ये व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला हे मुख्यमंत्रिपदाचे तीन प्रमुख दावेदार मानले जात आहेत. विधिमंडळ पक्षाने आपला पारंपारिक पायंडा पाळत मुख्यमंत्री निवडण्याचा सर्वाधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देणारा ठराव आधीच मंजूर केला आहे. त्यामुळे आता 'दिल्लीचे तख्त' कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, एकीकडे इतर राज्यांत सरकार स्थापनेची लगबग सुरू असताना, केरळम मध्ये मिळालेल्या विजयाला काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचे आणि संभ्रमाचे गालबोट लागले आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.