सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला नाशिकचा स्वयंघोषित बाबा अशोक खरात याचा आहे. खरात प्रकरणाने विधानसभेत देखील जोर धरुन ठेवला आहे. काल मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत खरातच्या अपराधांचा पाढा वाचला. त्यानंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी खरात प्रकरणावर बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. आव्हाडांनी 2007 मधला त्याचा पहिला गुन्हा विधानसभेत सांगितला. अशोक खरात बाबत अनेक मोठमोठे खुलासे झाले आहेत. असं असताना जितेंद्र आव्हाड यांनी खरातच्या गुन्हेगारी कारकिर्दीतील पहिल्या हत्येचा मुद्दा विधानसभेत मांडला आहे. अशोक खरात याने पहिली हत्या एका पत्रकाराची केली असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बाळू तुपे या पत्रकाराची हत्या झाल्यानंतर ही पोलिसांकडून खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- Swami Avimukteshwaranand Saraswati: ‘या’ प्रकरणात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “खरातने पहिला खून हा बाळू तुपे या पत्रकाराचा केला. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी आणि अनेक बड्या अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले, हे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहित असेल… ते प्रकरण लपवण्यासाठी पोलिसांनी देखील दोन कोटी रुपये घेतले, त्यांच काय करायच? जे ट्रस्टमध्ये आहेत ज्यांनी जमिनी दिल्या आहेत ते सुद्धा सहआरोपी आहेत… पत्रकार बाळू तुपे यांनी 2007 मध्ये खरातच्या भोंदूगिरीवर आणि अवैध कामांना जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला. मात्र खरातने बाळू तुपे यांच्यावरच उलट आरोप करत त्यांची निर्घृण हत्या केली. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. तसेच या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती.”
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरातने 2007 मध्ये केलेल्या पत्रकार बाळू तुपेच्या हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. 2007 मधील बाळू तुपे हत्याकांडाची फाईल आता पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे संकेत दिले आहेत.