नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन आणि अमानवी कृत्य केल्याच्या आरोपांनंतर नाशिक पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतले असून सध्या त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी केवळ पोलिसांकडूनच नव्हे, तर आयकर विभाग आणि विशेष तपास पथकाकडूनही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
तपासादरम्यान या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातसोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला होता.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नवे आरोप करत वाद अधिकच तीव्र केला आहे. ठोंबरे पाटील यांनी असा आरोप केला की, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली आहे.
ठोंबरे पाटील यांच्या आरोपानुसार, सगळ्यात आधी तो व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्याकडे आला होता. देसाई यांनी अशोक खरातची पत्नी आणि रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड करत कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांचीही विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी अशोक खरातचा एन्काऊंटर होईल असे वक्तव्य केले होते. मात्र पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तीचा एन्काऊंटर होत नाही, असे सांगत त्यांनी या विधानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“रुपाली चाकणकर असोत किंवा तृप्ती देसाई असोत, या दोघी नेमके कोणाला वाचवत आहेत आणि का वाचवत आहेत?” असा प्रश्नही ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच या संपूर्ण प्रकरणात तृप्ती देसाई यांचा नेमका काय संबंध आहे, याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालले असून तपास पुढे जात असताना अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न या प्रकरणाला नवे वळण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.