नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धर्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर नाशिक पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान विविध धक्कादायक माहिती समोर येत असल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले. अशोक खरातसोबतचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला. त्यानंतर चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला.
माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाबाबत भाष्य केले असून या काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
पोस्टमध्ये चाकणकर यांनी लिहिले की, “गेली वीस-बावीस वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना प्रगतीचा आलेख वाढत गेला तसा चिखलफेक करणारी विकृतीही वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने आणि शांतपणे टीका सहन केली. वैयक्तिक टीका करणे हे माझ्या स्वभावात नाही. मात्र आता सर्व मर्यादा ओलांडून माझ्यासह माझ्या कुटुंबालाही जो त्रास दिला जात आहे, तो भयावह आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “ज्यांनी माझा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला आहे ते सर्वजण संपर्क करून ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे सांगत आहेत. त्या सर्वांचे मनापासून आभार.”
खरात प्रकरणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करताना चाकणकर यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, “या प्रकरणात मी पहिल्याच दिवशी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पुराव्यासह स्पष्टीकरणही दिले आहे. सत्य नक्कीच समोर येईल, धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद!.”
दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास पुढे जात असताना या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते आणि पुढील घडामोडी काय घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.