नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण राज्यात अधिकच गंभीर वळणावर पोहोचले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या खरातकडून चौकशीतून दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून महिलांवरील अत्याचारांसोबतच आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती उघड होत आहे.
40 ते 45 राजकीय नेत्यांशी संपर्क?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या संपर्कात सुमारे 40 ते 45 राजकीय नेते असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे छापलेली असल्याचे समोर आले असून ती पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मोबाईलमध्ये ‘कोडवर्ड’ नावांनी संपर्क
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे खरातने त्याच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव करून ठेवली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच काही नेते कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी खरातचा सल्ला घेत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे.
इतकेच नव्हे, तर काही राजकीय नेते निवडणुकीचे अर्ज भरताना देखील खरातकडून मुहूर्त आणि तारीख विचारत होते, असा धक्कादायक खुलासाही समोर आला आहे. अंकशास्त्र, ज्योतिष आणि तथाकथित अघोरी विधी यांच्या माध्यमातून खरातचा प्रभाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
एसआयटीकडे क्लोन डेटा
तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून विशेष तपास पथकाला (SIT) फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा प्राप्त झाल्याची माहिती आहे. या डेटातून आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत एकूण 11 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी आठ गुन्हे महिलांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
मुलीच्या लग्नात दिग्गजांची उपस्थिती
9 आणि 10 जानेवारी 2026 रोजी झालेल्या खरातच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात अनेक राजकीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती असल्याचेही समोर आले आहे. यामुळे या प्रकरणातील राजकीय कनेक्शन अधिकच चर्चेत आले आहे.
चर्चेत असलेल्या नावांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर तसेच दीपक केसरकर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही नावे खरात याच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सलग 13 दिवसांपासून पोलिसांकडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे. त्याची पोलीस कोठडी उद्या संपणार असून त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे कोणती नावे उघड होतात, संबंधितांवर काय कारवाई होते आणि राजकीय पातळीवर याचे काय परिणाम होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.