राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा आरोप असलेल्या खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून पोलिसांना सुमारे 58 अश्लील आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती होती. त्यात देखील वाढ झाली असून आता त्याचे 100 व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे.
आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच सध्या पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरातची SIT चौकशी पूर्ण झाली असून पोलिस अशोक खरातची चौकशी करून कोर्टाकडे रवाना झाले आहेत. स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात हा गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत होता. आज भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान आतापर्यंत अशोक खरात बाबत अनेक मोठमोठे खुलासे झाले आहेत. असं असताना उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर “धक्कादायक निकाल लावून देतो” म्हणत अशोक खरातने त्या महिलेस पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा आहे. तसेच खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. यापूर्वी निवडणुकीत यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या ऑफिसमधील आणखी CCTV फुटेज SIT च्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे.