भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगानेच नांदेडमध्ये शनिवारी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर घणाघात केला होता. भाजप सध्या कमजोर ठिकाणी सभा घेत असल्याचे चव्हाण म्हणाले होते. चव्हाण यांच्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये आम्ही सभा ठेवली. तेव्हा अशोक चव्हाण म्हणाले की, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही त्यामुळे ते सभा घेत आहेत. परंतु अशोकराव असं काही नसून आमच्याकडे ९ वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही सभा घेत आहोत. त्यामुळे इतके लोकं याठिकाणी उपस्थित आहेत. अशोक चव्हाण तुमची मजल फक्त २जी, ३जी आणि सोनियाजी यांच्या पलीकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.
यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. फडणवीस म्हणाले, “काँग्रेसला अधूनमधून विजय मिळतो. तो त्यांच्या डोक्यात जातो. आता काँग्रेस नेते उठतात आणि म्हणतात राज्यात कर्नाटक पॅटर्न राबवणार. कालपर्यंत कर्नाटकचे नाव घेतले तरी त्यांना राग येत होता. आज ते कर्नाटक पॅटर्नची भाषा करतात. मात्र त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात फक्त एकच पॅटर्न चालतो. तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. हा पॅटर्न नरेंद्र मोदी यांनी आणला आहे. त्यामुळे राज्यात फक्त मोदी पॅटर्न चालणार.”
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो की, आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला, तर म्हणतो की, आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू. कर्नाटक म्हटलं की त्यांना राग येत होता. ते म्हणताहेत कर्नाटक पॅटर्न आणू पण मी त्यांना सांगतो की, महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न. येथे कुठलाही कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा पॅटर्न जर कुणी संपूर्ण देशात आणला असेल तर तो नरेंद्र मोदींनी आणलाय. मोदी पॅटर्न आपल्याला २०१४ आणि २०१९ मध्ये विजय मिळवून दिला. पण २०२४ मध्ये महाविजयाची तयारी आपण याठिकाणाहून सुरू केली आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.