महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख, सचिन वाझे, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांच्या पुढील चौकशीचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सीबीआयचा अर्ज स्वीकारला आहे. त्यानुसार सीबीआयने कारवाई केली असून सचिन वाझे, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. मात्र, याप्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, देशमुखांना रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुखांना ताब्यात घेतले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्रामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली असून १ नोव्हेंबर रोजी ईडीन देशमुखांना अटक केली. याप्रकरणी सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले असून सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन फेटाळल्यामुळे देशमुखांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, आता अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.