विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलाश नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला अज्ञात युवकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून, त्यामध्ये मध्यरात्री एका युवकाने कार्यालयाला आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमागील कारण आणि आरोपी कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.