Yashomati Thakur: “दादा, तुमचा वापर…” अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

अमरावतीतील निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Yashomati Thakur: “दादा, तुमचा वापर…” अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

अमरावती: सध्या राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, राजकीय वातावरण तापले आहे. सभांमधून आरोप – प्रत्यारोपांना जोर आला असतानाच, अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेवर जोरदार टीका केली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “जातीय कणा मोडून काढूया” या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हे विधान आम्हाला आवडले,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर थेट शब्दांत टीका केली.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने हे साध्य करायचे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा. एकीकडे तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत बसता, सत्तेत आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करता आणि दुसरीकडे भाजपविरोधी भूमिका घेत असल्याचे दाखवता. अशी दुहेरी भूमिका चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Thane Election 2026: तुमच्या प्रभागात कोण उभा आहे? उमेदवारांची ‘A टू Z’ यादी एका क्लिकवर

“तुम्ही खरोखर भाजपचा विरोध करत असाल, तर सत्तेतून बाहेर पडा. एकीकडे सेक्युलर मतदारांना आम्हीच पर्याय आहोत असे सांगायचे आणि दुसरीकडे गुंडगिरी करणाऱ्यांना ‘बघून घेऊ’ अशी भाषा वापरायची, हे योग्य नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

अमरावतीतील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावतीची स्थिती पाहिली तर गुंडगिरी करणारे लोक तुमच्याच पक्षाचे आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ, तर त्यासाठी आधी सत्तेतून बाहेर पडा, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

“सत्ताधारी तुमचा उपयोग करून घेत आहेत. तुम्हाला वापरून घेतले जात आहे. एकीकडे सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे आम्हाला सेक्युलरतेचे धडे द्यायचे, हे चालणार नाही. दादा, आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही सेक्युलरच राहणार आणि तुमच्यासोबत येऊ शकत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी केलेले हे विधान आणि थेट आव्हान राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमरावतीतील निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Pankaja Munde : ‘दोन पक्ष एकत्र आलेत, त्यांच्याकडे लक्ष्य देऊ नका’, मंत्री पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number