Amit Shah : देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत, सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार नव-क्रांती मेळाव्यात’ बोलताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. 'राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळ' (अंब्रेला ऑर्गनायझेशन) चे मुख्य कार्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवले जाईल, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील तसेच संपूर्ण देशातील नागरी बँकिंग व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
प्रत्येक तालुक्यापर्यंत बँकिंग जाळ्याचा विस्तार
मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, या मध्यवर्ती संस्थेच्या (अंब्रेला ऑर्गनायझेशन) माध्यमातून देशातील प्रत्येक तहसील स्तरापर्यंत नागरी सहकारी बँकांची पोहोच वाढवली जाईल. बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आणि रिझर्व्ह बँकेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या सहकारी बँकांनी या छत्राखाली एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे.
ठेवीदारांच्या सुरक्षेवर आणि तंत्रज्ञानावर भर
देशातील सुमारे 1400 नागरी सहकारी बँकांमध्ये सर्वसामान्यांचे लाखो कोटी रुपये जमा आहेत. या ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बँकांनी आधुनिक सॉफ्टवेअर आणि 'सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर'चा वापर करावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले. या नव्या यंत्रणेमुळे कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळेलच, शिवाय बँकांमधील गैरव्यवहारांवर मात करण्यासाठी विशेष सुरक्षा प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ होईल.
विनातारण कर्जाची मर्यादा वाढवून 5 लाख
सर्वसामान्य व्यापारी, छोटे व्यावसायिक, महिला बचत गट आणि मध्यमवर्गीयांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात सहकारी बँकांची भूमिका मोलाची असल्याचे सांगत शाह यांनी एक मोठा दिलासा दिला. कोणत्याही हमीशिवाय (Collateral Free Loan) दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा आता अडीच लाख रुपयांवरून थेट 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या प्रकारच्या कर्जांचा परतफेडीचा दर 99 टक्क्यांहून अधिक असल्याने छोटे व्यावसायिक अत्यंत प्रामाणिक असतात, हे सिद्ध होते. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राचे अथांग योगदान लक्षात घेऊनच या महत्त्वाकांक्षी संस्थेचे मुख्यालय राज्यात आणण्यात आले असून, यामुळे 'सहकारातून समृद्धी'च्या संकल्पनेला मोठे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.