Amazon ने आपल्या लोकप्रिय व्हॉइस असिस्टंटचे एआयवर आधारित नवीन व्हर्जन Alexa+ सादर केले असून त्यासोबतच अनेक डिव्हाइसेसचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले आहेत. कंपनीने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या खास कार्यक्रमात Echo स्पीकर्स, Fire TV, Kindle Scribe, Ring आणि Blink कॅमेरे यांची झलक दाखवली. ही उत्पादने येत्या वर्षाअखेरीस ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
Alexa+ चे नवे व्हर्जन अधिक स्मार्ट, संवादात्मक आणि वापरकर्त्याच्या आवडीनिवडी समजणारे आहे. Amazon च्या म्हणण्यानुसार, या अपग्रेडमुळे Alexa वापरण्याचा अनुभव अधिक वैयक्तिक आणि कार्यक्षम होणार आहे.
नवीन Echo डिव्हाइसेस वेगवान प्रोसेसरसह बाजारात येणार असून त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 99 डॉलर ते 219 डॉलर दरम्यान असेल. तर Blink कॅमेरे अधिक उच्च दर्जाचे रिझोल्यूशन देतात, ज्यामुळे घराच्या आत-बाहेरील सुरक्षा आता अधिक बळकट होणार आहे. Ring कॅमेऱ्यांमध्ये फेस रिकग्निशन फीचर देण्यात आले आहे, जे पाहुणे आणि संशयित व्यक्तींना ओळखू शकते.
Amazon ने Ring डिव्हाइससाठी एक अनोखी सुविधा दिली आहे. परिसरातील इतर Ring वापरकर्त्यांना सूचना पाठवून हरवलेले पाळीव कुत्रे शोधणे सुद्धा आता यामुळे शक्य होईल. त्यामुळे हे सुरक्षा साधन समाजिक मदतीचं माध्यमही ठरणार आहे.
याशिवाय Amazon नवीन Kindle Scribe टॅबलेट ही लाँच करणार आहे, ज्याची किंमत 630 डॉलर आहे. यामध्ये पहिल्यांदाच रंगीत स्क्रीन आणि डिजिटल लेखनासाठी स्टायलस देण्यात आला आहे. तसंच नवीन Fire TV सेट्स आणि स्ट्रीमिंग स्टिक Alexa+ कमांडने चित्रपटातील सीन शोधणे, हवी ती माहिती मिळवणे यांसारख्या सुविधा हे डिव्हाईसेस आपल्या उपलब्ध करून देवू शकतील.