राज्य शासनाने रायगड किल्ले संवर्धनासाठी 20 कोटींची मंजुरी दिल्यानंतर गडकिल्ल्यांच्या सन्मानार्थ आणखी एक अभिनंदनीय निर्णय घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि मावळ्यांनी ज्या गडकिल्ल्यांसाठी लढून स्वराज्य मिळवलं, त्या गडांवर आता दारूपार्ट्या करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Alcohol ban on forts of Maharashtra)
एकीकडे गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबवणारे तरुण ट्रेकर्स असतात, तर दुसरीकडे गडकिल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
राज्यात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. हे किल्ले म्हणजे स्वराज्याचे साक्षीदार आहेत.
मात्र अशा किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
यापूर्वीही अनेकदा किल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांना शिवप्रेमींनी चोप दिला आहे. राज्यशासनानेच आता यावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे.
गडकिल्ल्यांवर अशा ओल्या पार्ट्या करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास तसंच 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 85 अंतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्यानंतरही पुन्हा जर हाच अपराध करताना पकडले गेल्यास 6 महिन्यांऐवजी 1 वर्षाची शिक्षा होणार आहे.