अकोला: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2026 ही मतदानाची आणि 16 जानेवारीला निकालाची तारीख जाहीर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच अकोला महानगरपालिकेच्या रणांगणातून एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बच्चू कडू यांचा 'प्रहार जनशक्ती पक्ष' आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील 'शिवसेना (यूबीटी)' यांनी युतीचा हात पुढे केला आहे. ज्या नेत्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि सत्ता गेली, त्याच नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी पुन्हा हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती केवळ अकोल्यापुरती मर्यादित नसून 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या न्यायाने ठाकरेंनी टाकलेली ही मोठी खेळी मानली जात आहे. विशेष म्हणजे, प्रहारचे चार उमेदवार आता शिवसेनेच्या 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील हे प्रभाग क्रमांक 8 मधून 'मशाल' घेऊन मैदानात उतरणार आहेत. ही युती अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर अकोल्यातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी अलीकडेच राज ठाकरे यांच्या मनसेसोबतही महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली आहे. 'मराठी माणूस' आणि 'स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ताबा' या मुद्द्यांवर ठाकरेंनी आता लहान पण प्रभावशाली पक्षांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. अकोल्यात प्रहारची असलेली संघटनात्मक ताकद आणि ठाकरेंची सहानुभाती यांची सांगड घालून सत्ताधारी महायुतीला कडवे आव्हान देण्याची रणनीती यामागे दडली आहे.
2022 मध्ये झालेल्या सत्तांतराच्या वेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात महायुतीमध्ये त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र चूल मांडली. आता थेट उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अकोल्यात भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. प्रहारचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढत असल्याने मतविभाजन टाळण्याचा आणि थेट विजय खेचून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अकोला हा भाजपचा गड मानला जातो, मात्र प्रहार आणि शिवसेना (UBT) यांच्या एकत्र येण्यामुळे येथील गणिते पूर्णपणे बिघडू शकतात. प्रभाग क्रमांक 8 मध्ये मनोज पाटील यांच्यासह अन्य तीन उमेदवारही मशाल चिन्हावरच नशीब आजमावणार असल्याने हा प्रभाग या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे. या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असले तरी, कट्टर शिवसैनिक आणि प्रहारचे कार्यकर्ते कसे समन्वय साधतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
येत्या 15 जानेवारीला होणारे मतदान राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मनसे आणि आता प्रहारला सोबत घेतले आहे, त्यावरून ते केवळ भावनिक साद न घालता आक्रमक संघटनात्मक बांधणीवर भर देत असल्याचे स्पष्ट होत आहे. लवकरच या युतीची अधिकृत घोषणा होणार असून, त्यानंतर अकोल्यातील रणधुमाळी अधिकच रंगतदार होणार आहे.