राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये जवळपास एक-दीड तास चर्चा झाली. पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही भेट का झाली? त्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आणि राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची शक्यता वर्तावली जात आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी देखील शिवतीर्थवर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच या भेटीद्वारे त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात असावी अशी शक्यता आहे.