मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सभागृहातील सर्व सदस्यांनी उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबतचा एक महत्त्वपूर्ण किस्सा सांगत त्यांच्या कामकाजाच्या शैलीची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, अर्थकारणाशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून सुमारे 700 कोटींची डिक्री कमी करण्यात यश मिळाले होते. संबंधित प्रकरणावर सादरीकरण झाल्यानंतर अजित पवार यांनी “असेच प्रस्ताव पुढे आणत राहा” असे सांगत अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले होते.
बैठक संपल्यानंतर आम्ही चेंबरमध्ये गेलो. दादांची काम करण्याची पद्धत अत्यंत नेमकी होती. कोणतेही काम त्यांनी कागदावर दोन-तीन ओळींमध्ये स्पष्ट लिहून ठेवलेले असायचे. तेवढ्याच मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जायचा आणि काम पूर्ण व्हायचे, अशी त्यांची सवय होती, असे फडणवीस यांनी सांगितले.
कामकाजाची चर्चा झाल्यानंतर पुढील 30 ते 40 मिनिटे आगामी अर्थसंकल्प आणि राज्याच्या भविष्यातील योजनांबाबत गप्पा झाल्या. जवळपास एक तास आम्ही एकत्र होतो. त्यानंतर दादा चेंबरमधून निघून गेले. तीच आपली त्यांच्यासोबतची शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती, असे सांगताना मुख्यमंत्री भावुक झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला दादा वाचतील अशी आशा होती. मात्र पुढे आलेली बातमी अत्यंत धक्कादायक होती, असेही त्यांनी नमूद केले.
“अजित दादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, तर एका पिढीचा आत्मविश्वास होते. शेती, पशुसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची सखोल जाण असलेले, मातीतून तयार झालेले नेतृत्व म्हणजे अजित पवार होते,” अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अजितदादांच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले, मात्र त्यांनी कधीही अडचणींपासून पळ काढला नाही. चूक झाल्याची जाणीव झाल्यास सार्वजनिकरीत्या माफी मागण्याचे धैर्यही त्यांनी दाखवले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. अनेकांसाठी आधारवड ठरलेले, संकटात धीर देणारे अजित दादा आज आपल्यात नसणे ही राज्यासाठी अत्यंत दुःखद बाब असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.