पुणे: पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार यांनी पुण्यात जोरदार राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ खेळत विविध पक्षांतील माजी नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेतले आहे. अवघ्या 12 तासांत 9 बड्या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजप, काँग्रेस, मनसे तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या पक्षांना रामराम ठोकला. या नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना मोठा धक्का बसल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
भाजपचे धनंजय जाधव, मुकारी अलगुडे, शंकर पवार आणि मधुकर मुसळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे, शिवसेना ठाकरे गटाच्या नीता मांजळकर, एकनाथ शिंदे गटाचे आनंद मांजळकर आणि शरद पवार गटाचे स्वप्निल दुधाने या नेत्यांचा समावेश या पक्षप्रवेशात आहे. वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीतून आलेले हे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने पुण्यातील प्रभागनिहाय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घडामोडींमुळे अजित पवार गटाची पुण्यातील ताकद वाढली असून, महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठीची तयारी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटांमध्ये पुण्यात युती असल्याने, या नव्या प्रवेशांनी लढत अधिक रंगतदार होणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या ‘इनकमिंग’मुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे महापालिकेची ही निवडणूक आता केवळ स्थानिक न राहता राज्यस्तरीय राजकारणासाठीही निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत