पुण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या एका अनपेक्षित निर्णयामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असून, प्रशासनासह राजकीय विश्लेषकांचीही झोप उडाली आहे.
शनिवारी सकाळी अजित पवार कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय आणि वाहनांच्या ताफ्याशिवाय पुण्यातील 'बारामती हॉस्टेल'मधून अचानक अज्ञातस्थळी रवाना झाले. "कोणीही मागे येऊ नका," असा कडक इशारा देत अजित पवार एकटेच गाडी चालवत बाहेर पडल्याने, पुण्यात नेमकी कोणती मोठी 'राजकीय खिचडी' शिजतेय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या गूढ प्रवासामागे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मोठे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबतच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, चिन्हाच्या मुद्द्यावरून ही बोलणी फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काल रात्री उशिरा शरद पवार गटाची महाविकास आघाडीसोबत तब्बल पाच तास मॅरेथॉन बैठक पार पडली. या घडामोडींनी अजित पवार अस्वस्थ असल्याचे मानले जात असून, आज सकाळी त्यांचा हा 'सिक्रेट' प्रवास त्याच अस्वस्थतेचा परिणाम तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
अजित दादा बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर थेट कुठे गेले, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते त्यांच्या 'जिजाई' निवासस्थानी पोहोचले असण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या खासगी गाडीतून ते बाहेर पडले, ती गाडी 'जिजाई' बंगल्याच्या परिसरात उभी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, गाडी दिसली असली तरी दादांचे दर्शन तिथे कोणालाही झालेले नाही. त्यामुळे ते बंगल्यातच आहेत की तिथून दुसऱ्या एखाद्या गुप्त बैठकीसाठी रवाना झाले, याचे रहस्य अजूनही कायम आहे.
नेहमी लवाजम्यासह वावरणाऱ्या अजित पवारांनी अचानक पोलीस प्रोटोकॉल का मोडला? सुरक्षेशिवाय एकटेच बाहेर पडण्यामागे एखादी मोठी राजकीय रणनीती आहे की ते कोणा मोठ्या नेत्याला गुपचूप भेटायला गेले आहेत? या प्रश्नांनी कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील युतीची चर्चा फिसकटल्यानंतर निर्माण झालेली ही परिस्थिती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
राजकीय वर्तुळातील या 'हाय-व्होल्टेज ड्रामा'मुळे पुण्याचे वातावरण तापले आहे. अजित पवार यांचे हे मौन आणि त्यांचा हा 'नॉट रिचेबल' होणे राज्याच्या राजकारणात कोणत्या नव्या भूकंपाची नांदी ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.