Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी का बदलला? धक्कादायक माहिती समोर

ऐनवेळी वैमानिक बदलण्यात आल्याचा खुलासा समोर आल्याने, अनुभवी पायलट असूनही अपघात कसा झाला, यावर संशय व्यक्त केला जात आहे.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी का बदलला? धक्कादायक माहिती समोर

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. मुंबईहून बारामतीकडे झेपावलेले त्यांचे विमान लँडिंगच्या काही क्षण आधी काळाच्या जबड्यात ओढले गेले. दाट धुक्यामुळे समोरचे काहीच न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी आता या घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्या एका जवळच्या मित्राने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या अपघाताभोवती संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे.

वाहतूक कोंडी ठरली निमित्त; ऐनवेळी बदलला वैमानिक

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवासासाठी अजित पवार यांच्या विमानाची धुरा दुसऱ्या एका अनुभवी वैमानिकाकडे सोपवण्यात आली होती. कंपनीने बारामती उड्डाणासाठी रीतसर त्या वैमानिकाची निवड केली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. तो वैमानिक मुंबईच्या रखडलेल्या वाहतूक कोंडीत अडकला आणि त्याला विमानतळावर पोहोचायला विलंब झाला. दुसरीकडे, अजित पवार यांना नियोजित कार्यक्रमासाठी उशीर होत असल्याने विमान कंपनीने तातडीने ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सोपवली. ऐनवेळचा हा बदल आणि त्यातून घडलेली ही दुर्घटना आता चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा: Maharashtra Budget 2026 : यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार?

15000 तासांचा अनुभव अन् तरीही अपघात?

कॅप्टन सुमित कपूर हे नागरी उड्डाण क्षेत्रातील एक नावाजलेले नाव होते. त्यांच्या खात्यावर 15000 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा दांडगा अनुभव होता. "सुमित हा अत्यंत शिस्तप्रिय आणि अनुभवी पायलट होता. एवढ्या अनुभवाच्या जोरावर अशी तांत्रिक किंवा मानवी चूक होणे निव्वळ अशक्य आहे," असा दावा त्यांचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी केला आहे. ग्रोवर यांच्या मते, कपूर यांनी अनेक कठीण प्रसंगांत विमाने सुरक्षित उतरवली आहेत, मग बारामतीच्या ओळखीच्या धावपट्टीवर असे काय घडले? या प्रश्नाने आता तपासाची दिशा बदलण्याची मागणी जोर धरत आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी; घातपाताचा संशय?

कॅप्टन कपूर यांचे मित्र ग्रोवर यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कपूर हे अवघ्या काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून परतले होते आणि उड्डाणाच्या काही तास आधीच त्यांना या प्रवासाची माहिती देण्यात आली होती. ऐनवेळी वैमानिक बदलण्यापासून ते धुक्यातील लँडिंगपर्यंतच्या सर्व साखळीची तपासणी व्हावी, अशी भावना व्यक्त होत आहे. 'दादां'सारख्या मोठ्या नेत्याचा असा अपघाती अंत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला न पचणारा असून, संपूर्ण राज्य सध्या शोकसागरात बुडाले आहे.

हेही वाचा: Gram Panchayat Election: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; 14 हजार ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती होणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number