Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात शंकांचा डोंगर; सुनेत्रा पवारांची भेट घेऊन मांडला ‘तो’ विषय, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव

सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात शंकांचा डोंगर; सुनेत्रा पवारांची भेट घेऊन मांडला ‘तो’ विषय, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव

मुंबई: राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व आणि महाराष्ट्राचे ‘माजी उपमुख्यमंत्री’ असलेल्या अजित पवारांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. काळ कोणासाठी थांबत नाही, या न्यायाने राजकीय चक्रे पुन्हा फिरू लागली. मात्र, या भीषण विमान अपघाताच्या राखेतून अजूनही संशयाचे धूर निघतच आहेत. जानेवारीत झालेल्या या दुर्दैवी घटनेला आता काही महिने उलटून गेले असले तरी, या अपघाताभोवतीचे गूढ उकलण्याऐवजी अधिकच दाट होत चालले आहे. आता याच प्रश्नावरून खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी खदखद निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.

अजितदादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी धैर्याने परिस्थिती हाताळत उपमुख्यमंत्री पदाची तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. त्यांच्या बैठका आणि दौरेही वेगाने सुरू झाले आहेत. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा वरवरचा देखावा असला तरी, पक्षात आतून मोठी अस्वस्थता धुमसत आहे. याच अस्वस्थतेचा उद्रेक काल मध्यरात्री मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेत मनातील शंकांना आणि रोषाला वाट मोकळी करून दिली.

या मध्यरात्रीच्या बैठकीत आमदारांनी प्रामुख्याने डीजीसीएच्या (DGCA) अहवालावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघातानंतर तब्बल महिन्याभराने आलेल्या या अहवालात अनेक त्रुटी असल्याचा थेट दावा आमदारांनी केला आहे. “दादांचा अपघात की घातपात?” हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करून असताना, सीबीआय (CBI) चौकशीची मागणी अद्याप का प्रलंबित आहे? असा खडा सवालही या लोकप्रतिनिधींनी विचारला.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: फडणवीस-शिंदे सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ‘फायनल काऊंटडाऊन’ सुरू; कर्जमाफीबाबत कृषीमंत्री भरणे यांनी दिली ‘ही’ डेडलाईन

याच बैठकीत जानेवारीतील त्या भीषण अपघातानंतर मिळालेल्या दादांच्या काही वस्तूही आमदारांना दाखवण्यात आल्या, ज्यामुळे वातावरण अधिकच भावनिक आणि गंभीर झाले होते. यावर तोडगा म्हणून, सर्व आमदारांनी मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भेट घेण्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी मान्य केले आहे.

एका बाजूला अजित पवार गटातील वरिष्ठ नेते या विषयावर मूग गिळून गप्प बसले असताना, दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी मात्र अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोहित पवार यांनी या अपघाताचा ‘विविध अँगल’ने तपास व्हावा, यासाठी अक्षरशः रान उठवले आहे. सादरीकरण करून अपघातामागील सूत्रधारांचा शोध घेण्याची त्यांची मागणी आहे. या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत ते सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटले आहेत.

‘स्वतःच्याच पक्षातील मुख्य नेत्याच्या मृत्यूबाबत नेते गप्प का?’ हा प्रश्न आता राष्ट्रवादीच्या आमदारांना सतावू लागला आहे. आमदार अमोल मिटकरी यांचा अपवाद वगळता पक्षातील इतर दिग्गजांनी घेतलेल्या सोयीस्कर मौनामुळे आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. रोहित पवार ज्या ताकदीने हा विषय लावून धरत आहेत, तसे प्रयत्न आपल्याच पक्षातून का होत नाहीत, या जाणिवेने आमदारांमधील खदखद वाढवली आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या प्रकरणाला कोणती नवी राजकीय कलाटणी मिळते, हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Transport Strike: वाहतूकदारांचा सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर अनिश्चितकालीन संप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number