बारामती: राज्याच्या राजकारणातील एक धगधगतं नेतृत्व आणि ‘जनतेचा नेता’ अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेला आता पाच दिवस उलटले आहेत, मात्र महाराष्ट्राच्या मनातील चटका अद्याप कायम आहे. ज्या ठिकाणी त्यांनी विकासाची स्वप्ने पेरली, त्याच बारामतीच्या भूमीवर काळाने त्यांच्यावर घाला घातला. या भीषण अपघातात विमानातील पाचही जणांचा अंत झाला, ज्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय आणि राज्याचे राजकीय वर्तुळ हेलावून गेले आहे.
या धक्कादायक घटनेनंतर रिकाम्या झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या कारभार पाहणार आहेत. पतीच्या निधनाचे दुःख डोंगराएवढे असतानाही, जनतेप्रती असलेल्या कर्तव्यापोटी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की यामागे काही वेगळे कारण आहे, या संशयाचे ढग दूर करण्यासाठी राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे.
तपासासाठी दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष हलवले
सीआयडीने या प्रकरणाचा तपास हाती घेताच वेगाने चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे. आज तपासाचा एक भाग म्हणून बारामती विमानतळावरून त्या दुर्दैवी विमानाचे अवशेष (धूड) अधिक सखोल चौकशीसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या विमानाचा प्रत्येक भाग, इंजिन आणि ब्लॅक बॉक्सचा डेटा आता सीआयडीच्या निगराणीखाली तपासला जाणार आहे. या प्रक्रियेचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, तो पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा एकदा ओलावल्या आहेत.
रोहित पवारांची ती भावुक पोस्ट
हा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की;
“मनावरून कधीच न पुसणाऱ्या कटू स्मृतीचं प्रतिक बनलेलं हे धूड बारामतीतून चौकशीकामी हलवलं. ज्याने काळ बनून आमच्या #रिअल_हिरो ला आमच्यातून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली…! याची पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु पण आमचा रिअल हिरो परत येणार आहे का?”
रोहित पवारांच्या या प्रश्नाने समाजमाध्यमांवर चर्चा होत आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.