मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. सोमवारी मलिक तुरुंगाबाहेर आले. पण आता राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर ते कुठल्या गटाला साथ देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिक आपल्या गटाला पाठिंबा देतील असा दावा केला आहे. पण आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आठ दिवसांचा अवधी मागितला आहे. याचदरम्यान, मोठी राजकीय घडामोड समोर आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलिकांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी नवाब मलिकांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यात पहिल्यांदाच भेट होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांची फोनवरून चौकशी केल्याचे समोर आले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे या नवाब मलिकांच्या स्वागतासाठी काही तास जेलबाहेर उपस्थित होत्या. तसेच मलिकांच्या सुटकेसाठी शरद पवार – अजित पवार या दोन्ही नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. पण बदलेल्या राजकीय स्थितीत ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यावरील आरोपांचे गंभीर स्वरुप पाहता ते सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, असेही बोलले जात आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मलिकांची कन्या सना मलिक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.