पिंपरी – चिंचवड: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख जवळ येत असून, 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचार सभांना वेग आला असून, ठिकठिकाणी आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीचे वातावरण तापले असताना सर्वच पक्षांनी प्रचाराची धडाकेबाज मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अशातच पिंपरी – चिंचवडमध्ये सुरू असलेल्या प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीतील विनोदाने एकच हशा पिकवला. भाषण सुरू असताना एका महिला कार्यकर्तीने भाषणासंदर्भातील चिठ्ठी आणून दिली. त्याच वेळी सभेच्या ठिकाणावरून एका कार्यकर्त्याने “अजितदादा, वी लव यू” असा आवाज दिला.
यावर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर देत म्हणाले, “घड्याळाचं बटन दाबते, लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण ‘लव यू”, त्यांच्या या उत्तरावर सभेत एकच हशा पिकला.
पुढे बोलताना त्यांनी त्याच मिश्किल अंदाजात आणखी एक टोला लगावला. “बायको म्हणेल, आज लईच बिघडलाय गडी,” असे म्हणत त्यांनी वातावरण आणखी हलके केले. त्यांच्या या सहज, विनोदी आणि मोकळ्या संवादशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले.
एकंदर निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापलेले असताना अजित पवारांनी विनोद आणि मोकळ्या संवादातून सभेतील ताण कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. सध्या त्यांच्यावर विविध आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही, “मी निवांत आहे आणि मला याचा कोणताही परिणाम होत नाही,” असा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या वागणुकीतून उमेदवारांना आणि राजकीय नेत्यांना मिळाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत घडलेला हा ‘अजितदादा लव यू’चा प्रसंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.