पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचे स्थान नेहमीच प्रभावी राहिले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली घडलेला राजकीय प्रवास आणि त्यांनी उभा केलेला वारसा आजही राज्यातील राजकारणाला दिशा देतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या, तरी कौटुंबिक प्रसंगी पवार कुटुंबीय नेहमीप्रमाणे एकत्र दिसतात. त्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा असल्याने हा सोहळा अधिकच चर्चेत आला आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज विवाह सोहळा आज होणार आहे. मात्र, अजित पवार या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कारण त्यांचा आजचा दिवस संपूर्णपणे निवडणूक प्रचारासाठी राखीव आहे. सकाळी 10 वाजता भोर येथे सभेने त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात होणार असून त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामतीमध्ये सभा नियोजित आहेत. बारामतीतील सभा सायंकाळी 6.30 वाजता आहे, तर विवाह सोहळा 5.15 वाजता, दोन्ही वेळा जवळ आल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा: PM Modi: 'मन की बात' चा 128 वा भाग आज; पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
विवाहाच्या पूर्वसंध्येला पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी उपस्थिती लावली. जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे सोहळ्यात सहभागी झाले.खासदार सुप्रिया सुळे यांनी हळदी समारंभातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात त्या युगेंद्रला हळद लावताना दिसतात.
युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून काका अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ही लढत राज्यातील चर्चेचा विषय ठरली होती. शेवटी अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तरीही आजचा विवाहसोहळा हा सर्वांमध्ये सलोखा दिसण्याचा क्षण ठरत आहे.
अजित पवार उपस्थित राहणार का?
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार तापलेला आहे. अजित पवारांनी निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले असून त्यामुळे ते विवाहाच्या वेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तथापि, रात्री उशिरा ते विवाहस्थळी येऊ शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या दिवशी पवार कुटुंबातील ऐतिहासिक राजकीय अध्याय आणि कौटुंबिक नात्यांची उब दोन्हीही एकत्र अनुभवायला मिळणार आहेत. आता अजित पवार प्रत्यक्ष हजेरी लावतील का, हे पाहण्यासाठी सर्वांचेच लक्ष विवाहस्थळाकडे लागले आहे.