Ajit Pawar Funeral: "पवार साहेब, तुम्ही बसा…; शरद पवारांना राज ठाकरेंचा आधार, नेमकं काय घडलं?

बारामतीत अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे दाखल झाले. राजकीय मतभेद विसरून दोन दिग्गज नेते दु:खाच्या क्षणी एकत्र आल्याचा भावूक प्रसंग पाहायला मिळाला.

Ajit Pawar Funeral: &quotपवार साहेब, तुम्ही बसा…; शरद पवारांना राज ठाकरेंचा आधार, नेमकं काय घडलं?

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व आणि जनसामान्यांचे 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामतीमध्ये झालेल्या त्या भीषण विमान अपघाताने केवळ एका नेत्यालाच नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा एक भक्कम आधारस्तंभ हिरावून घेतला आहे. नियतीने घातलेल्या या घालामुळे आज अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असून बारामतीचा परिसर हुंदक्यांनी भरून गेला आहे.

शरद पवारांचा खंदा आधार हरपला

अजित पवार यांचे जाणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी नियतीने दिलेला सर्वात मोठा वैयक्तिक आणि राजकीय आघात आहे. साहेबांच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहणारा त्यांचा 'खंदा अर्जुन' आज अनंतात विलीन झाला आहे. ही दु:खाची वेळ किती भीषण आहे, याची प्रचिती आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आली, जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली.

राज ठाकरे आणि शरद पवार: दु:खाच्या क्षणी सोबत 

सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासह बारामतीत दाखल झाले. शरद पवारांना भेटल्यानंतर राज ठाकरेंच्या डोळ्यांतही पाणी तरळले होते. यावेळी एक अत्यंत भावूक प्रसंग पाहायला मिळाला. अतोनात दु:खात असतानाही शरद पवारांनी राज ठाकरेंना बसण्याची विनंती केली, मात्र राज ठाकरेंनी अत्यंत आदराने "साहेब, तुम्ही बसा" असे म्हणत त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. दोन दिग्गज नेत्यांमधील हा संवाद उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहिले आहेत. 

हेही वाचा: Ajit Pawar Last Rites: गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करत घेतलं अजितदादांचं अंतिम दर्शन

बारामतीमध्ये शोकसागराचा पूर

अजितदादांच्या काटेवाडी येथील निवासस्थानापासून त्यांची अंतिम यात्रा निघाली होती. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागराचा पूर लोटला आहे. "दादा परत या", "अजितदादा अमर रहे" अशा घोषणांनी आसमंत भरून गेला आहे. हातातील कामे सोडून, बाजारपेठा बंद ठेवून प्रत्येक बारामतीकर आज आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्याच्या भावनेने अश्रू ढाळत आहे.

शासकीय इतमामात अखेरचा निरोप

अजित पवार यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले आहेत. या अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, राज्याचा एक कर्तबगार लोकनेता आज पंचतत्वात विलीन झाले आहेत.

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. शिस्त, कामाचा धडाका आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे जनमानसात घर केलेले 'दादा' आता फक्त आठवणींच्या रूपानेच महाराष्ट्राच्या हृदयात राहतील.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर; विमानात ‘गगन’ प्रणाली नव्हती? फक्त 28 दिवसांनी..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number