बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य ‘अजित पवार’ या मजबूत आधारावर उभे होते, तोच आधारस्तंभ 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात कोसळल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादांच्या या चटका लावणाऱ्या अकाली एक्झिटमुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर राज्याच्या संपूर्ण राजकीय सारीपाटाची गणितेच विस्कळीत झाली आहेत. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला एक आक्रमक आणि ‘मास लीडर’ हरपल्याने आता सत्ताधारी महायुती आणि विरोधक अशा दोघांनाही रणनीतीची नव्याने आखणी करावी लागणार आहे.
काका-पुतण्यांच्या दिलजमाईला बसली खीळ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक निर्माण झाली होती. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय अंतर कमी होत असून, जिल्हा परिषद निवडणुकांनंतर हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, हे नक्की मानले जात होते. अनेक ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाने अजितदादांच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. मात्र, नियतीने या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवरच घाला घातला आहे. दादांच्या जाण्याने आता हा मनोमिलनाचा प्रयत्न अधांतरी राहतो की शरद पवार स्वतः पुढाकार घेऊन कुटुंबाला आणि पक्षाला सावरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा?
अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच, पक्षात आता नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संघटनात्मक अनुभव असला, तरी कार्यकर्त्यांना भावनिक आधार देण्यासाठी आणि पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी ‘पवार’ नावाचाच चेहरा हवा, असा सूर उमटू लागला आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी खासदार सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणी आमदारांच्या एका मोठ्या गटाने खाजगीत लावून धरली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय झालेल्या सुनेत्रा वहिनींनी अल्पावधीतच पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा धीर वाढवण्यासाठी त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
राजकीय गणितांचे पुढे काय?
अजितदादांच्या निधनानंतर आता बारामती आणि पुण्याच्या राजकारणात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व पाठीशी असले, तरी वाढत्या वयामुळे त्यांना दैनंदिन कामकाजावर मर्यादा येत आहेत. अशावेळी एकीकृत राष्ट्रवादीचे नेतृत्व दादाच करतील, असे संकेत मिळत होते. परंतु, आता दादांच्या जाण्याने शरद पवारांना पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षाची विखुरलेली सूत्रे जमवावी लागतील. दुसरीकडे, महायुतीमधील जागावाटप आणि सत्तेतील वाटा यावरही या घटनेचा मोठा परिणाम होणार आहे, कारण अजितदादांच्या शब्दाला महायुतीत मोठे वजन होते.
शोकाकुल महाराष्ट्र
राज्य सरकारने अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज 29 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले आहेत. या आणीबाणीच्या काळात सुनेत्रा पवार या जबाबदारी स्वीकारून अजितदादांचा वारसा पुढे नेणार की शरद पवार नवी रणनीती आखणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र, सध्यातरी महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ हरपल्याने सर्वत्र शांतता आणि शोकाचे वातावरण आहे.