राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल घडवणाऱ्या अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये नेतृत्व आणि संघटनात्मक पुनर्रचनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नव्या उर्जेसह उभं करण्यासाठी पवार कुटुंबात जबाबदाऱ्यांचं स्पष्ट वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्ष आगामी 2029 च्या निवडणुकांसाठी सज्ज होताना दिसत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाने तीन स्तरांवर नेतृत्व मजबूत करण्याचा फॉर्म्युला आखल्याचं बोललं जात आहे.
सुनेत्रा पवारांकडे राज्यस्तरीय नेतृत्व
अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून राज्यभर सक्रिय राहणार असल्याचं समजत आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना त्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, पक्ष संघटना मजबूत करणे आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, या त्यांच्या दौऱ्यांचा मुख्य हेतू असेल. ग्रामीण तसेच शहरी भागात पक्षाची पकड टिकवण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
पार्थ पवारांकडे मुंबई-दिल्ली समन्वय
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे राजधानी मुंबईसह दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क आणि समन्वय साधण्याबरोबरच मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर असेल. राजकीय पातळीवर पक्षाची उपस्थिती ठळक करण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यासाठी पार्थ पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
जय पवारांकडे बारामती-पुणे ग्रामीणची धुरा
पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण जबाबदारी जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी संपर्क वाढवणे, प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि पक्षाचा जनाधार टिकवून ठेवणे, ही जबाबदारी त्यांच्यावर असेल. ग्रामीण भागातील संघटनात्मक बळकटी वाढवण्यासाठी जय पवार सक्रियपणे कामाला लागल्याचे संकेत मिळत आहेत.
पक्ष पुन्हा आक्रमक मोडमध्ये
या तिन्ही स्तरांवर जबाबदाऱ्यांचे वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे. कौटुंबिक एकजूट दाखवत पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीत नव्या नेतृत्वाला पुढे करत पवार कुटुंबाने राजकीय समीकरणे नव्याने मांडण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिन्यांत या नव्या रणनीतीचा परिणाम राज्याच्या राजकारणावर दिसून येण्याची शक्यता आहे.