पिंपरी-चिंचवड: "माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे संपूर्ण देशाला माहिती आहे, पण ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले, आज मी त्यांच्यासोबतच सत्तेत बसलो आहे ना?" अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना पेचात पकडले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार फटकेबाजी केली.
शहरातील प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचाराने शिरकाव केल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, "रस्ते, शिक्षण आणि अगदी कुत्र्यांच्या नसबंदीमध्येही भ्रष्टाचार झाला आहे. सत्ताधारी भाजपकडे शहराच्या विकासाचे कोणतेही व्हिजन नाही." 2017 पूर्वी राष्ट्रवादीच्या काळात पालिकेच्या ठेवी चार हजार कोटी पेक्षा जास्त होत्या, त्या आता 2000 कोटींवर कशा आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उलट ठेवी वाढवण्याऐवजी कर्जरोखे काढून महापालिकेवर कोट्यवधींचे कर्ज लादण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ भ्रष्टाचार करून पैसे कमावण्यावर आहे, असा घणाघात अजित पवारांनी केला. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली ही महापालिका भाजपच्या काळात कर्जाच्या खाईत लोटली गेल्याचा दावा त्यांनी केला. पालिकेच्या 8000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. "या ठेवी मोडून नेमकी काय विकासकामे केली, ते आधी जनतेला दाखवा," असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. सव्वा किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी 81 कोटींचा खर्च दाखवणे, हा सत्तेचा माज असल्याची टीकाही त्यांनी केली.
अजित पवारांनी यावेळी स्वतःच्या कामाचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, "1992 ते 2017 या काळात मी पिंपरी-चिंचवडचा विकास केला. आम्ही कधी सत्तेचा उन्माद केला नाही, पण सध्या टेंडरमध्ये रिंग करणे आणि दादागिरी करणे सुरू आहे. 'अर्बन स्ट्रीट'च्या नावाखाली रस्ते अरुंद करून वाहतूक कोंडी निर्माण केली गेली आहे." महापालिकेत सुरू असलेल्या या हप्तेखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि पुराव्याशिवाय मी बोलत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडच्या जनतेला भावनिक साद घालत अजित पवार यांनी घड्याळ-तुतारी युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. "मला पुन्हा संधी द्या, मी शहरात दररोज पाण्याची व्यवस्था करेन. मी जे बोलतो ते करून दाखवतो, तेवढी धमक माझ्यात आहे," अशा शब्दांत त्यांनी मतदारांना आश्वस्त केले. भाजपने केलेल्या 'विठ्ठल मूर्ती घोटाळ्या'चा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या 'भ्रष्टाचाराच्या भुके'वर कडाडून टीका केली.
एकूणच, अजित पवार यांनी केलेल्या या रोखठोक विधानामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःवर झालेल्या 70 हजार कोटींच्या आरोपांना ढाल बनवत त्यांनी भाजपच्याच 'नैतिकतेवर' प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, 'पुरावे देईन' या त्यांच्या इशाऱ्यामुळे सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर लागलेला हा 'आरसा' भाजप नेत्यांना किती झोंबतो आणि महायुतीमधील हा अंतर्गत कलगीतुरा मतदारांच्या मनावर काय परिणाम करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.