नागपूर : एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश करत नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. 1 डिसेंबरपासून नागपूर – बेंगळुरू दरम्यान दररोज दोन उड्डाणे सुरू होणार आहेत. यासोबतच 2 डिसेंबरपासून दिल्ली आणि पुणे येथून अबूधाबीला थेट आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू होणार आहे. गेल्या दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने पाच नवीन स्थानकांचा समावेश करून एकूण गंतव्यस्थाने 60 इतकी केली आहेत. कंपनीच्या मते, या नवीन सेवांमुळे महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती अधिक लक्षवेधी होणार आहे.
नागपूर – बेंगळुरू उड्डाणांचे वेळापत्रक
1 डिसेंबरपासून दररोज दोन फेऱ्या चालणार आहेत. पहिलं उड्डाण सकाळी 10 वाजता नागपूरहून सुटून दुपारी 12:05 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. दुसरं उड्डाण रात्री 9:05 वाजता नागपूरहून सुटून 11:10 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. परतीच्या फेऱ्यांमध्ये बेंगळुरूहून सकाळी 7:25 वाजता उड्डाण सुटेल आणि 9:30 वाजता नागपूरला येईल, तर संध्याकाळी 6:30 वाजता उड्डाण सुटून 8:35 वाजता नागपूरला पोहोचेल.
महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार
एअर इंडिया एक्सप्रेस सध्या मुंबईहून आठवड्याला 130 हून अधिक आणि पुण्याहून 90 हून अधिक उड्डाणे चालवते. आता नागपूरचा समावेश झाल्यामुळे विदर्भातही या विमान कंपनीची उपस्थिती वाढेल. तसेच, कंपनी नवी मुंबई विमानतळावरूनही 35 साप्ताहिक उड्डाणे सुरू करत आहे, ज्यामध्ये बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता ही शहरे जोडली जातील.
गल्फ कनेक्टिव्हिटीला चालना
एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या गल्फ नेटवर्कचा विस्तार करत असून 2 डिसेंबरपासून दिल्ली – अबूधाबी दरम्यान चार आणि पुणे – अबूधाबी दरम्यान तीन साप्ताहिक उड्डाणे सुरू करणार आहे. या नवीन सेवांमुळे भारत आणि मध्यपूर्वेतील व्यावसायिक तसेच पर्यटन प्रवाशांना मोठी सोय होईल.
महाराष्ट्राची कला घेऊन उडणारी विमाने
एअर इंडिया एक्सप्रेसने महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला सलाम करत तीन नवीन विमानांना खास असा लुक दिला आहे. या विमानांवर राज्यातील प्रसिद्ध कलाशैली हिमरू, पैठणी आणि वारली यांची चित्रे दिसतात. हे उपक्रम एअर इंडिया एक्सप्रेसच्या ‘Tales of India’ मोहिमेचा भाग आहेत, ज्याद्वारे कंपनी 25 राज्यांतील 50 हून अधिक पारंपरिक कलाशैलींचं प्रदर्शन करते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “ही योजना भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला नवी ओळख देते. महाराष्ट्राची कला, हस्तकला आणि पारंपरिक कथा सांगण्याची परंपरा आम्ही विमानांच्या डिझाइनमधून जिवंत केली आहे.” या नव्या सेवांमुळे नागपूर आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आनंददायी होणार आहे.