मुंबईतील नरिमन पॉईंट येथील प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीला लवकरच राज्याच्या नव्या प्रशासकीय केंद्राचे स्वरूप मिळणार आहे. मंत्रालयावरील जागेचा वाढता ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने या इमारतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, काही दिवसांतच येथे मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॅबिनेट हॉल आणि मुख्यमंत्री कार्यालय उभारण्याच्या कामाला वेग आला असून, आज मुख्य सचिवांच्या उपस्थितीत या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. राज्य सरकारने अलीकडेच केंद्र सरकारकडून ही 23 मजली एअर इंडिया इमारत खरेदी केली आहे. या इमारतीत मंत्रालयाबाहेर विविध खासगी इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या राज्य सरकारच्या विभागांना टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये अधिक एकत्रितपणे कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
योजनेनुसार, इमारतीच्या 23 व्या मजल्यावर सुमारे 5,611 चौरस फूट जागेत मुख्यमंत्री कार्यालय (CMO) उभारण्यात येणार आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या या सर्वोच्च मजल्यावरून मुख्यमंत्री थेट प्रशासनाचा कारभार पाहणार आहेत. याशिवाय, 22 व्या मजल्यावरील सुमारे 13,363 चौरस फूट जागेत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा कॅबिनेट हॉल तयार केला जाणार आहे. भविष्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका याच ठिकाणी होणार असल्याने आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षा सुविधांची उभारणी सुरू आहे.
या संपूर्ण प्रकल्पाबाबत आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार असून, विविध विभागांचे स्थलांतर, अंतर्गत बांधकाम, सुरक्षा व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या मंत्रालयात जागेची कमतरता असल्यामुळे अनेक सरकारी विभाग दक्षिण मुंबईतील विविध खासगी इमारतींमध्ये कार्यरत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने जवळपास 9 लाख चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेतली असून, त्यावर दरमहा 200 कोटी रुपयांहून अधिक खर्च होत असल्याचे सांगितले जाते. एअर इंडिया इमारतीत विभागांचे स्थलांतर झाल्यानंतर हा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
1972 मध्ये उभारण्यात आलेली ही गगनचुंबी इमारत मुंबईच्या महत्त्वाच्या वास्तूंमध्ये गणली जाते. आता या इमारतीतून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रिमंडळाच्या बैठका आणि विविध शासकीय विभागांचे कामकाज सुरू झाल्यानंतर मंत्रालयासोबतच एअर इंडिया इमारतही राज्य प्रशासनाचे दुसरे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.