सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षासह सत्ताधारीपक्ष देखील कामाला लागले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून महायुतील अंतर्गत वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे पक्षप्रवेशावरुन शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि नेते भाजपवर नाराजी दाखवत असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद देखील पेटला आहे.
विधानसभेत सुनिल तटकेंच्या विरोधात काम केल्याचा आरोप भरत गोगावलेंवर करण्यात आला आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठे विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच त्यांना ओपन चॅलेंज देखील केलं आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी एकच सांगतो, जर तुम्ही देवाला मानत असाल, तर मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे धावीर महाराज आहे, माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहेत. दोन्ही एकच देव आहेत. या दोन्ही देवाच्या माथ्यावरच, पिंडीवरचे फुल उचलायचे. जर भरत शेठनी लोकसभेला काही चुकीचे काम केले असेल तर त्याचे प्रायचित्त भरत शेठ भोगेल. जर आमदारकीला काही चुकीचे काम केले असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचे ते भोगतील. मी आज सगळ्यांसमोर आव्हान करतोय”.
हेही वाचा- Parth Pawar Land Scam : “पार्थ पवारला अडकवण्यामागे तटकरे”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा
“जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ झुकत नाही हा आमचा बाणा आहे. काय हेसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रमधून तुमची एक सीट आम्ही निवडून दिली. सगळ्या महाराष्ट्रमध्ये सुपडा साफ झाला होता. इथे फक्त आमच्या महेंद्रनी,रवी शेठ नी, मी आणि योगेशनी थोडी फक्त वाकडी मान केली असती तर याचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते. एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामात मदत केली तर आपण त्याची आयुष्यभर जाणीव ठेवतो. वा रे वा आम्हाला आवाहन करताय… स्वीकारला आव्हान आम्ही स्वीकारलं… धावीर महाराज जर नाय कोपला या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारा इथेच करा आणि इथेच भरा लांब जाण्याची आवश्यकता नाही.”