महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा मोठी उलथापालत होताना पाहायला मिळत आहे. नुकतीच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भेट घेतली होती. यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करणार अशा चर्चांना उधाण आलं होत.
अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. विनोद तावडेंची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार संजय राऊतही उपस्थित असल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याऐवजी खडसे हे ठाकरे गटाशी जवळीक वाढवत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, कालच एकनाथ खडसे यांनी भाजप नेते विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. दरम्यान ठाकरे आणि खडसे यांच्या भेटीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सलग झालेल्या या दोन महत्त्वाच्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खडसे यांची पुढील राजकीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार, याबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले.