संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनासाठी वकिलाने आता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे यांचे वकील ऍड. संग्राम देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देसाई यांनी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणाणी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. तर अधिवेशनादरम्यान सभागृहातही नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र तेव्हापासून नितेश राणे फरार आहेत. तसेच त्यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. परंतु सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आज नितेश राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे.